top of page
Search

स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती निमित्त

  • सायली देशपांडे
  • Mar 24, 2023
  • 2 min read


जन्मठेपेची शेवटची रात्र


"ती माझी जन्मठेपीच्या शिक्षेची कारागृहातील शेवटची रात्र होती. परंतु ती शेवटची रात्र होती हें आता नि

श्चित करतां येत आहे. त्या रात्री ती शेवटची आहे असें निश्चित करतां येत नव्हतें. जर ही रात्र कारागृहांतील माझी शेवटचीच रात्र असेल तर! अहाहा- उद्यां या वेळेस ज्या झोपेवर वार्डरचा पहारा नाहीं अशी स्वच्छंद झोंप मला,खिडक्या मोकळ्या टाकलेल्या अशा कोण्यातरी चांदणे अंथरलेल्या खोलीत,लागलेली असणार..!


पण ही शेवटची रात्र नसेल तर नसो! निदान ह्या जीवनाची जी शेवटची रात्र होणारी आहे ती तरी या बंदिशाळेची शेवटची रात्र होणारी आहेच ना!


त्या रात्री भयंकर थंडी पडली होती. जानेवारी महिना असूनहि पावसाची जोराची सर आली होती. आमचीं पांघरुणें आम्हांस पुरत नसत. दोन चवाळी येरवड्याच्या थंडीस पुरेनात. दोन चड्या, दोन कुडते,ते एकावर एक घातले तरी थंडी लागे,पण कपडा असा अधिक उरलेलाच नाहीं. इतक्यात ती पावसाची सर! मागच्या भिंतीच्या खिडकींतून सारखे फवारे आत उडता उडता खोलीत निजणे अशक्य झालें. कपडे भिजले,तेव्हां एका कोपऱ्यात अंग शक्य तितके आकुंचन करून आणि ती अर्धी ओली वस्त्रे लपेटून दबून बसलों. तशाच थंडीत काहीं गुंगी घेत घेत सकाळ झाली.


बंदिगृहात अशा कोपऱ्यांत बसून निजणाऱ्या रात्री कित्येक काढलेल्या होत्या. ही शेवटची रात्र ठरली म्हणून तिची स्पष्ट आठवण राहिली.


सकाळी नेहमीप्रमाणे कार्यक्रम चालला. मागें मदनलाल धिंग्रांच्या चरित्राचे जे व्याख्यान अर्धेच सोडले होते ते पुरे करण्यासाठी नुसत्या उभ्या उभ्याच दहा पांच राजबंदिवानांस तो उत्तरार्ध सांगत होतों. कारण त्या दिवशी सर्वांची सभा भरवून व्याख्यान देण्यास संधी सापडली नाहीं.


तोंच कार्यालयांतून पर्यवेक्षकाचें बोलावणे आलें. त्याबरोबरच तेथील कोण्या विश्वासू अधिकाऱ्यांचा संदेशही आला कीं - " तुम्ही सुटलांत!"


स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या सुपरिचित अशा "माझी जन्मठेप" या कादंबरीतील शेवटच्या प्रकरणातील हा परिच्छेद. आज वि.दा. सावरकर यांची जयंती. का करतो हो आपण जयंत्या पुण्यतिथ्या अशा राष्ट्रपुरुषांच्या? एक दिवस खूप देशप्रेम जागृत करायचं सकाळपासून दिवस संपेपर्यंत नुसतं ओरडत सुटायचं, भाषणं द्यायची,जयजयकार करायचे, मुर्त्यांना हार घालायचे, त्यांनीच लिहिलेल्या पुस्तकातील चार ओळी उद्बोधन म्हणून या झोपेचे सोंग घेतलेल्या समाजाला ऐकवायच्या,लोकांनी पण वाह वाह किती छान म्हणत टाळ्या वाजवायच्या, आपण आपलंच कौतुक करून घ्यायचं आणि परत पुढचं वर्ष येतपर्यंत हातावर हात ठेवत याच सुप्त समाजात गप्प बसायचं.


काय उपयोग अशा जयंती उत्सवाचा? याची वाट बघतात का सगळे राष्ट्रपुरुष? माझ्यापुरतं बोलायचं झालं तर माझं उत्तर आहे -नाही. नुसतं त्या त्या व्यक्तींवर बोलून,त्यांनी लिहिलेली पुस्तकं वाचून काहीही उपयोग नाही. जर त्यांचे विचार आणि विचारांचे पालन जर समाजात होत असेल आणि ते सुद्धा संपूर्ण आदराने तर त्यांच्या हौतात्म्याचा काही अर्थ नाही. मुळात इतक्या महान असलेल्या भारतमातेच्या सुपुत्रांनी आपल्या साठी बलिदान द्यावं इतके काही आपण ग्रेट नक्कीच नाही.


मुळात या कादंबरीचे प्रास्ताविक लिहिताना स्वातंत्र्यवीर स्वतः लिहितात की, " कधीं वाटे सांगण्यासाठी का हें सगळें भोगिलें! तर मग तो सगळा अभिनयच म्हणावयाचा. आमचा अंदमानाचा वृत्तांत नि तेथे बंदिवास कंठीत असतांना भोगाव्या लागलेल्या यातना यांची कहाणी ऐकण्यासाठी महाराष्ट्रातच नव्हे,परंतु उभ्या हिंदुस्थानात आमच्या सहस्त्रावधी देशबांधवांनी सहानुभूतीपूर्ण औत्सुक्य आजपर्यंत अनेक समयीं व्यक्त केलेलें आहें. त्यातही सुहृदांस आपण भोगिलेली उत्कट सुखदुःखे सांगतांना समवेदनांच्या अश्रूंनी स्निग्ध होणारा तो मधुर आनंद उपभोगण्यासही आमचे हृदय आमच्या सुटकेपासून साहजिकत:च कासावीस होत आलें आहे."


आजच्या त्यांच्या जयंतीनिमित्त आपण एक नवीन संकल्प नक्कीच करू शकतो की त्यांच्यासारख्या द्रष्ट्या भारत भू च्या सुपुत्राच्या विचारांना नजरेसमोर ठेवत जर आपण आपली प्रत्येक कृती केली तर ते आणि त्यांचे विचार आपले आदर्श आहेत आणि आपण त्यांचे पालन करतो हे म्हणणे उचित ठरेल. म्हणून "देहाकडून देवाकडे जाताना देश लागतो,आणि या देशाचे आपण देणे लागतो" हा आद्यमंत्र आपण जपला आणि जपला पाहिजे. हे ज्यादिवशी होईल त्यादिवशी खऱ्या अर्थाने वि. दा. सावरकर यांची जयंती साजरी झाली असं म्हणता येईल..!


" स्वातंत्र्यलक्ष्मीकी जय"



 
 
 

Recent Posts

See All
वाट काढत पुढे चला

अगदी परवाचीच गोष्ट. मी बस मध्ये चढले आणि बसला खूप गर्दी होती. कंडक्टर काकांनी टिकीट दिलं आणि मी त्यांना म्हंटलं, "काका मी इथूनच उतरू का,...

 
 
 
प्रेक्षक (तरी) कुठे काय करतात...!

मुळातच नुसतं समाज माध्यमं म्हणजेच अगदी शुद्ध मराठी भाषेत 'सोशल मीडिया' हा खूप मोठा आणि वेगळा विषय आहे. त्याची व्याप्ती, आशयघनता, त्याचा...

 
 
 

Comentarios


bottom of page