top of page
Search

सहज सख्या….!

  • सायली देशपांडे
  • Mar 24, 2023
  • 4 min read

ग्रीष्मातलं ऊन सकाळची वेळ.. घड्याळाचे काटे आपल्या रोजच्या गतीने सारखे आपल्याच तालात पुढे पुढे सरकत होते. ९ वाजता घड्याळाने ९ ठोके दिले आणि आपल्याच विश्वात रमलेल्या रेवतीला एकदम भानआलं ते त्या आवाजानी.

रेवती… दिसायला सावळी पण सुंदर, रेखीव डोळे, पाठीवर रुळणारी काळ्याभोर केसांची लांबसडक वेणी. यासगळ्या सौंदर्यात भर घालणारं होतं ते तिचं लाघवी हसणं. हसतांना डाव्या गालावर पडणारी खळी म्हणजेआणखी एक सौंदर्यस्थान..वयाच्या २४ व्या वर्षी तिचं पाणिग्रहण केलं ते राजस नी.. राजस हा एका खाजगीकंपनीत मॅनेजर होता. मॅनेजर असल्याने पत मोठी जबाबदारी मोठी आणि कामही जास्त. खाजगी कंपनी असल्याने सुट्यांचा प्रॉब्लेम पण त्यातही रेवती आणि राजस यांचा संसार अगदी आनंदात आणि सुरळित चालला होता. रेवती अगदी अन्नपूर्णा…! तिच्या हातचं सुग्रास जेवण आणि तासनतास चाललेला त्यांच्या गप्पा या दोहोंच्या मिलापात तासभर सहज निघून जायचा. त्यांच्या अनेक सुख दुःखांचा साथीदार होता तो घरचा डायनिंग टेबल. असं सगळं गुण्यागोविंदाने सुरू होतं.

रोज सकाळी रेडीओवरची गाणी ऐकत तिच्या कामांना गती मिळायची. आणि त्याची सकाळ सुद्धा त्या

रेडिओच्या आवाजामुळेच व्हायची. काल सुद्धा असंच झालं रेडीओवर लागलेल्या "जागो मोहन प्यारे" या

सुरेल गाण्याने त्यांची सकाळ अगदी प्रसन्न झाली. गाणं गुणगुणतच रेवतीने चहाचं आधण गॅसवर

उकळायला ठेवलं चहा उकळला तिने तो कपात गाळला दूध घातलं आणि हसतमुखाने राजस ला गुड

मॉर्निंग म्हणत चहाचा कप आयता हातात आणून दिला पण रोज तिला प्रतिसाद देणारा आणि रेवतीला

मुद्दाम चिडवणारा राजस आज काहीसा हरवल्या सारखा वाटत होता..!

कामाची गडबड टेंशन असेल असं म्हणत रेवतीने त्याचं हे मौन समजून घेतलं. पण आता त्याचा तुटक संवादतिला अस्वस्थ करायला लागला. न्याहारी झाली की बरं वाटेल त्याला म्हणून तिने छान मेथी पराठ्याचा बेत आखला. त्याचं सगळं आवरून तो न्याहारीला आला पण काहीही उत्तर न देता फक्त तो पराठ्याचे घास पोटात ढकलत होता. निःशब्द आणि शांततापूर्ण वातावरणात त्याने कशीबशी न्याहारी आटोपली. टिफिन घेतला आणि तो ऑफिसला गेला सुद्धा…!

आता घरात उरली ती फक्त एकटी रेवती आणि तिचा रेडिओ. रेडिओ आपल्याच तालासुरात गात होतापण इथे मात्र कितीही विचार केला तरी या दोघांचे ताल सूर कुठेतरी हरवले होते. राजसचं असं वागणं रेवतीला खटकत होतं. लग्न होऊन जेमतेम दोनच महिने झाले होते. आपल्या सुखी संसाराला कोणाची दृष्ट तर लागली नसेल ना? असा स्त्री सुलभ विचार तिच्या मनात येऊन गेला. तिचं मन कशातच रमत नव्हतं. स्वयंपाक झालाच होता जेवायला अवकाश म्हणून तिने पुस्तक वाचायला घेतलं पण मनात राजस त्याचे विचार शेवटी कंटाळून तिने पोटाला आधार म्हणून दोन घास खाल्ले. दुपारी ठरल्याप्रमाणे तिने राजसला फोन केला. फोनवर सुद्धा मोजकीच उत्तरं देऊन त्याने फोन ठेवला. याला नेमकं झालं तरी काय? हा एकच विचार तिच्या मनात घर करून बसला. ७ वाजता घरी येणारा राजस आज ५:३० ला घरी आला. त्याला लवकर घरी आलेलं बघून रेवतीला जरा हायसं वाटलं.

तिने त्याला आवडते तशी स्ट्रॉंग कॉफी करून आणली आणि त्याच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवित न राहवून त्याला विचारलं,"सकाळपासून स्वारी नाराज दिसतेय काय झालंय काय नेमकं? आपण दोघं मिळून त्यावर काही उपाय शोधू" या तिच्या साध्या प्रश्नावर तो अगदीच चिडून बोलला. आज त्याचं ते चिडणं आणि तार सप्तकात लागलेला सूर ऐकून रेवती हबकूनच गेली. राजसचं बोलणं ऐकून तिला फार वाईट वाटलं. उगीचच आपण त्याला विचारलं असं तिला वाटलं. संध्याकाळी बगिच्यात फिरून येणारं हे नवदाम्पत्य आज घरीच. एरवी रेडिओवर लागणारं प्रत्येक गाणं गुणगुणणारी रेवती तिचं आवडतं " सहज सख्या एकटाच येई सांजवेळी"हे गाणं सुद्धा गुणगुणत नव्हती. एरवी तिच्या सुरात राजस सुद्धा सूर मिसळून हे गाणंगायचा. अत्यंत आवडतं असं गाणं तिच्यासाठी खूपच रुक्ष झालं होतं.

रात्रीचं जेवण झालं. सगळी आवराआवर झाली. राजस आपलं काम करत हॉलमध्येच बसला. त्याची वाट बघत बघत रेवती बेडरूममध्ये गेली. विचारांची तंद्री लागल्यावर कधी तिचे डोळे लागले ते कळलंच नाही. सकाळी उठल्यावर रेवती आपल्या रोजच्या कामाला लागली. घराच्या बगिच्यात जाऊन देवपूजेसाठी फुलं तोडून आणली. ग्रीष्म आणि मोगरा हे निसर्गाचं समीकरण काही त्यांच्या बगिच्यात अपवाद नव्हतं मनसोक्त मोगऱ्याची टपोरी फुलं तिने तोडून आणली आणि डायनिंग टेबल वर फुलांची टोपली ठेवली. मोगरा हा त्या दोघांचा विक पॉईंट..! पण आज दोघांमध्ये विशेष संवाद नव्हता रोजचं हसतं खेळतं घर आज खूप शांत होतं.

राजस तयार होऊन डायनिंग टेबल वर न्याहारीची वाट बघत बसला.लक्ष गेलं ते त्या टपोऱ्या मोगऱ्याच्या फुलांकडे. त्याची कळी कालपासून शांत होती तिला बोलतं करायला फुलांचा गजरा करणं क्रमप्राप्त होतं आणि सॉरीच्या सोबतीला मोगरा होताच..! त्याला लहानपणी आईने गाठीचा गजरा गुंफायला शिकवलं होतं, ते एकदम त्याला आठवलं आणि काही वेळात गजरा तयार. रेवतीने गरमागरम पोहे केले आणि प्लेट राजसला दिली. त्याचा टिफिन भरायला ती वळली तेवढ्यात राजसनी तिचा हात धरला. त्याच्या स्पर्शाने तिच्या डोळयांत पाणी आलं. तिला त्याने खुर्चीवर बसवलं आणि तिला आवडतो तसा त्याने गुंफलेला गजरा तिच्याकाळ्याभोर केसात माळला..पोह्याचा एक घास तिला भरवला आणि त्याच्या असं विचित्र वागण्याचं कारण तिला सांगितलं.

ऑफिसमध्ये असलेलं कामाचं लोड त्यानी तिला सांगितलं आणि सगळं घडघड बोलून तो मोकळा झाला.तिची माफी मागितली. त्यांच्यातली शांतता हळूहळू निवळली पण ती कुठेतरी दुखावली गेली होती. पण आनंद हा होता की त्यांच्यातलं वादळ पेल्यातच शमलं.

आपलं सुद्धा असंच होतं आपल्यात सुद्धा कुठेतरी राजस रेवती असतात राजस जर बोलला नाही तर

आपल्यातली रेवती कुठेतरी दुखावते. संसारात एकमेकांना समजून घेणं,साथ देणं हीच खरी गंमत असते.होणारे वाद आणि वैचारिक वाद हे पेल्यातच शमले पाहिजे.आता काय दोघांना स्वर्ग अगदी दोनच बोटं उरला होता. त्यांच्यातला संवाद सुरू झाला होता. आणि या सुखाच्या सोबतीला साथ होती ती त्यांच्या

आवडत्या गाण्याच्या ओळींची.. रेडिओ वर लागलं परत तेच गाणं…

"सहज सख्या एकटाच येई सांजवेळी वाट।

वाट तुझी पाहीन त्या आम्रतरुखाली।।

अधरी जे अडत असे सांगीन तुज गुज असे।

प्रीत ही प्रीतिविण अजूनही अबोली…."


 
 
 

Recent Posts

See All
वाट काढत पुढे चला

अगदी परवाचीच गोष्ट. मी बस मध्ये चढले आणि बसला खूप गर्दी होती. कंडक्टर काकांनी टिकीट दिलं आणि मी त्यांना म्हंटलं, "काका मी इथूनच उतरू का,...

 
 
 
प्रेक्षक (तरी) कुठे काय करतात...!

मुळातच नुसतं समाज माध्यमं म्हणजेच अगदी शुद्ध मराठी भाषेत 'सोशल मीडिया' हा खूप मोठा आणि वेगळा विषय आहे. त्याची व्याप्ती, आशयघनता, त्याचा...

 
 
 

コメント


bottom of page