फोटोज, आठवणी आणि बरंच काही...
- प्राजक्ता बर्वे
- Mar 24, 2023
- 1 min read
आज नवीन फोन घेतल्या पासून पहिल्यांदाच (दोन वर्षानंतर), फोनची गॅलरी साफ केली!
किती आठवणी असतात ना त्यात..पण खरं तर त्या बंद कप्प्यात तश्याच राहून जातात.

मी लहान असतांना रोल टाकून फोटो काढायचे कॅमेरे होते. एकदा आम्ही उटीला गेलो असतांना बाबा मला खूप रागवले कारण मी उठ सूठ कसेही फोटो काढू लागले. अर्थात मी साडेतीन चार वर्षांची असेन तेव्हा पण सांगण्याचा उद्देश हा की एकेका क्लिकला केवढी किंमत होती. काळजीपूर्वकच फोटो काढल्या जायचे आणि मग ते डेव्हलप होऊन येईपर्यंत वाट पाहात बसायचं. इतकी काळजी घेऊन सुध्दा डेव्हलप होऊन आलेले फोटोज चांगले असतीलच याची काही खात्री नाही. काय करणार. तेव्हा प्रीव्ह्यू नसायचा ना!
आज मात्र मी जवळपास अडीच हजार फोटोज डीलीट केले तेव्हा एक जाणवलं, त्यातले कितीतरी मी कधी काढलेत, का काढलेत, हे सुध्दा आठवेना. म्हणजे फार फार तर दीड-दोनशे फोटोज माझ्या आठवणीत स्टोअरड होते.
फोटोज काढून इकडे तिकडे पोस्ट करायचेत हेच आजकाल डोक्यात असतं. त्या आठवणी मात्र ब्लर होत जातात. कारण सोप्पं आहे, त्या गॅलरीत कधी आपण सहज म्हणून डोकावतंच नाही आणि जेव्हा मेमरी संपत येते तेव्हा तिकडे गेल्यावर कळतं- च्यायला आपली इन-बिल्ट मेमरी रिकामीच राहीली यार!
म्हणून फोटो काढू नका, डोळ्यात सगळं साठवा असं फिलॉसोफिकल काही मी म्हणंत नाहीये. भरपूर फोटो काढा, वाट्टेल तिकडे पोस्ट करा पण कधी तरी, फोनच्या गॅलरीत पण डोकावून बघा.
आठवणी मोबाईलच्या स्टोरेज मधून तुमच्या मेंदूच्या स्टोरेज मधे नक्की जातील!
Comments